इतिहासातिल किल्ले वि त्यांची महिती

 

मुरुड जंजिरा

मुरुड जंजिरा


रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे.

रायगड जिल्ह्याच्या पश्चिम अंगाला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडच्यापुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनार्‍यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड-जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे.
जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर ५७२ तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. शिवाजीच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला.

इतिहास

जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रुढ झालेला आहे. अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरुन तो आलेला आहे. जझीरा म्हणजे बेट. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहेमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे रहात असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली.
राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही, याची कल्पना पिरमरखानाला होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत, असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलाशी स्नेह राहावा म्हणून दारूची काही पिंपे त्याने भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खूष झाला. पिरमखानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमखान मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरमखानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला.
पुढे पिरमखानाच्या जागी बुर्‍हाणखानाची नेमणूक झाली. त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुर्‍हाणखानाने बांधलेले आहे. पुढे इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जात
जंजिर्‍याचे सिद्दी हे मूळचे अबिसीनियामधील असून, हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्‍न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिर्‍यावर स्वामित्व मिळवता आले नाही. इ.स.१६१७ ते इ.स.१९४७ अशी ३३० वर्षे जंजिरा अंजिक्य राहिला. जंजिर्‍याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर, या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुर्‍हाणखानाची दर्पोक्तीच या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे, असे ते चित्र आहे. बुर्‍हाणखान इतर सत्ताधीशांना सुचवतो आहे की, "तुम्ही हत्ती असाल, मी पण शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका."
या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक पाच सहा किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही.

किल्ल्याची अवस्था

जंजिर्‍याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे ही एक दरवाजा आहे. असे एकोणीस बुलंद बुरूज आहेत. दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायर्‍या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिर्‍यावर ५१४ तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात.
किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली.
जंजिर्‍याच्या तटबंदीवरुन विस्तृत प्रदेश दिसतो. यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग व किनार्‍यावरील सामराजगड हेही येथून दिसतात. ३३० वर्षे अभेद्य आणि अंजिक्य राहिलेल्या जंजिरे मेहरुब पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करुन जंजिर्‍याला भेट दिल्यास ती निश्चितच संस्मरणीय ठरेल.'
असा हा अजेय जंजिरा, २० सिद्दी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्दी मुहमंदखान हा शेवटचा सिद्दी असताना, व त्या राज्याच्या स्थापनेनंतर ३३० वर्षांनी, म्हणजे ३ एप्रिल १९४८ रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले.

वासोटा किल्ला


वासोटा किल्ला

साहसाची अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्‍न आहे.

तर चला जाणून घेयुयात आपण वासोटा किल्ला बद्दल

इतिहास 
वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. ’वसिष्ठ’चे पुढे वासोटा झाल असावेे, अशी कल्पना आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसर्‍या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो.
वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे. शिवाजीच्या काळात या किल्ल्याचा वापर 'तुरुंग' म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य. पूर्वी तेथे वाघ, बिबट्यांसारखे प्राणीही होते. हे प्राणी अजूनही आहेत
शिवाजीने जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही. पुढे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि ६ जून १६६० रोजी घेतला.
अफझलखाच्या वधानंतर शिवाजीच्या दोरोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. त्यांनी सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकार्‍याला अटक केली व वासोट्यावर ठेवले. .सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढील वर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणीबरोबर लढाई केली. आठदहा महिन्यांच्या प्रखर झुंजीनंतर ताई तेलिणीचा पराजय झाला आणि १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.


वासोट्याला जाण्यासाठीचे रस्ते

वासोट्याला जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. एक कोकणमधून आणि दुसरा घाटमाथ्यावरुन. कोकणातील 'चिपळूण'कडून वासोट्याच्या पश्चिम पायथ्याच्या चोरवणे या गावापर्यंत गाडीमार्ग असून या मार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या (एस.टी.बस) गाड्या आहेत. चोरवणेपासून नागेश्वराच्या सुळक्याकडून वासोट्याकडे येता येते. दुसरा मार्ग हा जास्त सोयीचा आहे. सातारा-कास-बामणोली असा गाडीरस्ता असून यावर रा.प. च्या बसेस आहेत. बामणोली हे गाव शिवसागर जलाशयाच्या पूर्व काठावर आहे. येथून वासोट्याकडे जाण्यासाठी शिवसागर ओलांडावा लागतो. त्यासाठी बामणोलीमध्ये लॉचेस उपलब्ध होतात. येथून वनखात्याच्या परवानगीने वासोट्याकडे जाता येते..
लॉचमधून साधारण ४० ते ५० मिनिटांच्या प्रवासानंतर आपण वासोट्याच्या जवळ पोहोचतो. पाण्याच्या फुगवट्यानुसार हा कालावधी कमी जास्त होतो. पायथ्याजवळ मेट इंदवाली नावाचे गाव होते. ते फार पूर्वीच उठून गेलेले आहे. त्याचे अवशेष अजूनही दिसतात.
या अवशेषांच्या जवळूनच गडावर जाणारा धोपट मार्ग आहे. या मार्गाने काही अंतर गेल्यावर आपण पायथ्याला पोहोचतो. पायथ्याला ओढ्याकाठी मारुतीची मूर्ती आहे. येथूनच किल्ल्याची चढण आणि जंगल सुरू होते. सोबतच्या पाण्याच्या बाटल्या ओढ्यातून भरुन घेणे गरजेचे आहे. हा चढाईचा मार्ग दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलामधून जातो. यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे व वनस्पती आपल्याला दिसतात. या जंगलात अनेक प्रकारची वन्य श्वापदे आहेत. श्वापदांत गवे आणि अस्वले प्रामुख्याने आहेत. त्यामुळे सावधगिरीने आणि गोंगाट न करता चढाई करावी लागते. कुठलाही प्राणी केव्हाही दर्शन देऊ शकतो. त्यातल्यात्यात गव्यापासून आणि अस्वलापासून अंतर राखणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.
अर्धाअधिक किल्ला चढल्यावर एक वाट उजवीकडे जाते. ही वाट केतकीच्या गाद्याजवळून पुढे नागेश्वराकडे जाते. सरळ वाटेने वर चढल्यावर जंगल विरळ होऊन कारवीचे रान लागते. कारवीच्या रानातून वर चढल्यावर किल्ल्याच्या पायर्‍या लागतात. त्या चढून भग्न प्रवेशद्वारातून गडात प्रवेश होतो.

वासोटा गडावर

गडाच्या प्रवेशद्वाराजवळून डावीकडील तटबंदीच्या कडेने जाऊन पूर्वेकडील बाजूस पोहोचल्यावर शिवसागर जलाशयाचा आणि अथांग पसरलेल्या जंगलाचा देखावा आपल्याला मुग्ध करतो. याच बाजूला पाण्याचे टाके आहे. हे टाके भिंतीमुळे दोन भागात विभागले गेले आहे. पिण्यायोग्य पाणी गडावर येथेच आहे. येथून झाडीतून दक्षिण टोकावर गेल्यावर समोरच जुना वासोट्याचा डोंगर दिसतो. जुन्या वासोट्याच्या बाबू कड्याचे तसेच पाताळवेरी गेलेल्या दरीचे दृश्य आपल्याला खिळवून ठेवते. येथून परत पाण्याच्या टाक्यांकडे येऊन उत्तर टोकाकडे निघायचे. गडावरही सर्वत्र झाडीझाडोरा वाढला असल्यामुळे गडावरच्या वास्तू त्यात लुप्त झाल्या आहेत. वाटेवर मारुती मंदिर, मोठ्या वाड्याचे अवशेष तसेच महादेव मंदिर आहे. तेथून पुढे उत्तरेकडील माची आहे. या माचीवर बांधकाम नाही. पण येथून दूरपर्यंतचा परिसर दिसतो. नागेश्वर सुळक्याचे दर्शन उत्तम होते. कोकणातील विस्तृत प्रदेशही येथून न्याहाळता येतो. वासोटा हा गिरिदुर्गाबरोबरच वनदुर्गसुद्धा आहे. म्हणून याला 'मिश्रदुर्ग' म्हटले जाते. येथून दिसणारे नागेश्वर शिखर फारच सुंदर दिसते. नागेश्वर सुळक्याच्या अलीकडे आणखी एक सुळका आहे त्याला तुळशी वृंदावन किंवा ठेंगा असे नाव आहे. पूर्व दिशेला ठोसेघर पठारावर दिसणार्या पवनुर्जा प्रकल्पातील पवन्चक्क्याही सौंदर्यात भरच घालतात.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

इतिहासातिल किल्ले व त्यांची महिती

इतिहासातिल किल्ले व त्यांची महिती-काळदुर्ग